Friday 7 April 2017

साल्हेर ला कसं जायचं ? काय बघायचं ?

सह्याद्री - तमाम मराठी रयतेचा अभिमानाचा आणि गौरवाचा विषय. ह्याच दुर्गम सह्य रांगांमध्ये अनेक राजवटींनी किल्ल्यांची निर्मिती केली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य उभारणीत ह्याच गडकोटांनी अवघ्या महाराष्ट्राचं नशीबच पलटवलं आणि एका सोनेरी युगाचा आरंभ झाला.
आज अनेक तरुण दुर्ग भटकंती मध्ये रस घेताना दिसतायत. बरेचवेळा अपुऱ्या माहितीविना बऱ्याच जणांची फजिती सुद्धा झालेली बघायला मिळते. माझ्या आजवरच्या दुर्ग भ्रमंती मध्ये बरेच अनुभव गाठीशी आले. चुकांमधून शिकत शिकत सह्याद्रीला मी गुरु मानलं आणि मला भरभरून ज्ञान मिळालं. अजूनही मिळतंय. पुढेही मिळत राहील. सह्याद्री नेहमी कृपा दृष्टी ठेऊन असतो आपल्यावर. तर असे एक एक गडकोट फीरतांना मी येऊन पोचलो सह्याद्रीतील सर्वोच किल्ले माथा - दुर्ग साल्हेर.  साल्हेर वारी तशी सोपी नाही आणि ह्यासाठीच इथपर्यंत कसं पोहचायचं ते आपण बघूया.

           सर्वप्रथम नाशिक शहर गाठणं महत्वाचं. नाशिक हे सर्व मार्गांनी महाराष्ट्राशी जोडलं गेलंय. त्यामुळे इथे आपण सहजरित्या पोहचू शकतो. नाशिकच्या जुन्या एस टी स्टॅन्ड वरून सटाणा ह्या तालुका ठिकाणी जाण्यासाठी गाड्या चालू असतात. साल्हेर किल्ला हा तसा लांब आणि दुर्गम भागात असल्यामुळे इथपर्यंत पोहचायला आपल्याला थोडे कष्ट उचलावे लागतात आणि वेळ सुद्धा खर्ची करावा लागतो. पण हे सगळं तुम्ही केव्हाच विसरता जेव्हा साल्हेर तुम्हाला मायेने कवेत घेतो. सटाणा वरून एस टी ची रहदारी कमी होते आणि त्यांच्या वेळा पाळणं म्हणजे आपला प्लॅन लांबू शकतो. ह्यासाठी सटाणा स्थानकाबाहेर प्रायवेट जीप उभ्या असतात. sharing पद्धतीने आपण ताहराबाद गाठायचं. हा संपूर्ण पट्टा महाराष्ट्र -गुजरात सीमारेषा नजीक असल्यामुळे येथून  गुजरातला ये जा करणाऱ्या लोकांची संख्या बरीच आहे.

          नाशिक - ताहाराबाद हे अंतर आपले २ तास नक्कीच खर्ची घालतो. ह्या जीप अतिशय टिपिकल जीप असून, खचाखच माणसं भरल्याशिवाय निघत नाहीत. त्यामुळे आपल्या बॅग्स ची व्यवस्थित काळजी घेणं उत्तम. ट्रेकर्सना ह्याची चांगलीच सवय असते पण नवखा माणूस थोडा बिचकू शकतो. ताहराबादपासून साल्हेरवाडी मार्गे गुजरात जाणाऱ्या बऱ्याच जीप उभ्या असतात. ती जीप पकडायची आणि गाडीवाल्याला सांगायचं वाघांमबे गावात उतरवा. ताहाराबाद -वाघांमबे साधारण पाऊण तास आहे. असे अनेक चढ उतार करत आपण एकदाचे साल्हेर पायथ्याला पोहोचतो -वाघांमबे . नाशिक -वाघांमबे तुमचे तीन साडे तीन तास नक्कीच घेतो. पण जितका मार्ग दुर्गम तितके फळ जास्त हा ट्रेकिंगचा नियमच असून तो आपण पळत वाघमबे मध्ये पाय उतार व्हायचं.


 साल्हेर चा प्रचंड आकार , इथे पोहचण्यास लागणारा वेळ हे सर्व पाहता गडावर एक तरी मुक्काम करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी घरातून निघताना जेवणाची सर्व व्यवस्था लावणं खूप महत्वाचं. कारण गावातून वाटाड्या मिळेल पण जेवणाची व्यवस्था गडावर कोणी करून देईल ह्याची मला थोडी शंका आहे. त्यामुळे आपली व्यवस्था आपण करणं केव्हाही उत्तम. ५-६ तासांचा प्रवास करून आपण दामलेलो असतो. त्यामुळे थोडी विश्रांती घेणं फार गरजेचं ठरतं. ह्यापुढील चढाई तब्बल तीन तासांची असल्यामुळे आपण "छत्रपती शिवाजी महाराज कि जय " म्हणायचं आणि मोर्चा वळवायचा थेट गडाच्या दिशेने. गावामागच्या शेतातून एक पायवाट एका ओढ्याकडे जाते. ओढा पार करून ही पायवाट एका उंचवट्यावर घेऊन जाते. हे टेकाड पार केलं कि एक मळलेली पायवाट आपल्याला स्पष्ट दिसते. ही वाट शेवटपर्यंत सोडायची नाही. इथून आपण सह्याद्रीचं रौद्र रुप डोळा भरून बघायचं. आपल्या उजव्या बाजूस बुलंद -बलाढ्य आणि अजस्त्र असा दुर्ग साल्हेर. तर डावीकडे साल्हेरचा भाऊ दुर्ग सालोटा आपले लक्ष वेधून घेतो. आपण ज्या वाटेने जातोय ती वाट एका खिंडीत येऊन थांबते. इंग्रजी 'व्ही ' आकाराची हि खिंड. येथून दोन वाटा फुटतात. डावीकडे सालोटा तर खिंडीतून सरळ साल्हेर. मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं कि अनेक जण साल्हेर करताना त्याच्या शेजारीच असलेला आणि अतिशय सुंदर अश्या सालोटा ला भेट देत नाहीत. सालोट्याच्या वाट्याला अशी उपेक्षा पाहवत नाही. वास्तविक सालोट्याची चढाई चांगलीच दम काढणारी असून त्याच्या ७५ कातळ कोरीव उंच पायऱ्या चढताना अनुभवलेला थरार आपण कधीच विसरू शकत नाही. सालोट्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा दरवाजा व त्याच्यावर तयार केलेली देवडी  (देवडी म्हणजे पूर्वी पहारेकरी सैनिक जिथे थांबत असत ती जागा ).  साधारणपणे देवडी ही दरवाज्याच्या बाजूला असते. पण सालोट्याचा दरवाजा अश्या अवघड ठिकाणी बांधला असून , उजवीकडे ३०००ft दरी आणि डावीकडे उभा अरुंद कातळ. त्यामुळे ह्याच्या दुर्ग निर्मात्याने चांगलीच कलपना लढवत दरवाज्याच्या वरच देवडी बांधून आपल्या दुर्ग स्थापत्याची कमाल दाखवली आहे. सालोट्याच्या माथ्यावरून साल्हेरचे जे अफाट दर्शन होते त्याला काय म्हणावे. आपण ज्या खिंडीतून वर येतो ती जागा आणि साल्हेर ची पुढील पायवाट येथून अगदी स्पष्ट दिसते. साल्हेरचा उभा कातळ ज्याप्रकारे 'C ' आकारात खोदून तयार केलेली वाट आणि त्या खाचेत रुबाबदारपणे उभा असलेला दरवाजा जर बघायचा  असेल तर सालोटा वरूनच हे शक्य आहे. त्यामुळे आवर्जून वेळ काढून सालोटा बघावा असं मी सांगतो. 



                     ट्रेक चालू होताच आपले स्वागत करणारे सह्याद्रीचे दोन रांगडे भावंडं : साल्हेर-सालोटा



                                        खिंड ओलांडल्यावर दिसणारा भव्यदिव्य सालोटा 


सालोटा आल्या वाटेने उतरून पुन्हा खिंड गाठावी. खिंडीतून सरळ जाणारी पायवाट थोड्याच वेळात आपल्याला साल्हेर च्या प्रथम दरवाजासमोर आणते. हा दरवाजा पार करून थोड्याच अंतरावर दुसरा दरवाजा असून ह्याची जागा आणि रचना तोंडात बोटं घालून बघावी अशीच आहेत. मघाशी सांगितल्याप्रमाणे 'C ' आकारात कातळ खोदून वाट बनवलेली दिसते. येथे एक फारसी भाषेतील शिलालेख सुद्धा आढळतो. ह्या नंतर येतो तिसरा दरवाजा आणि आपला गड प्रवेश होतो. साल्हेरचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची दरवाज्यांची  मालिका. तब्बल सात दरवाजे आणि तेही सुस्थितीत बघून फार समाधान मिळतं. पैकी तीन हे वाघांमबे बाजूने तर उरलेले चार हे साल्हेरवाडी बाजूने आढळतात. गडप्रवेश होताच सुसाट वारा आपला थकवा पळवून नेतो. काही अंतर पार केलं की आपण 'गंगासागर ' ह्या सुंदर बांधीव तळ्याजवळ येतो. चारही बाजूने सुंदर बांधकाम आणि मधोमध एक खांब असलेलं हे तळं आपले मन आकर्षित करतं. ह्याच्या काठावर सुबक मंदिर असून त्यात रेणुकादेवी व गणेशाची मूर्ती आहे. 'गणपती बाप्पा मोरया 'म्हणायचं आणि पुढची वाटचाल चालू करायची. ह्या मंदिरामागच्या एका छोट्याश्या उंचवट्यावर दोन मुक्काम योग्य गुहा असून आपण आपले बस्थान इथेच ठोकायचे. २० माणसांची आरामात सोय होईल अशी जागा असून समोरच चुलीचे दगड सुद्धा रचलेले दिसतात. काम च झालं. पोटपाणी आणि जरा अराम झाला कि गडाच्या पश्चिम बाजूकडे मोर्चा वळवायचा. म्हणजेच गंगासागर तलावावरून सरळ पुढे. इथे एक यज्ञवेदी दिसते व एक खोदीव टाकं सुद्धा लागतं. पाणी पिण्यायोग्य आहे. चिंता नसावी. 


साल्हेरच्या अप्रतिम दरवाज्यांपैकी एक दरवाजा  -वाघमबे बाजूने 



पश्चिम बाजूचा साल्हेरवाडीत उतरणारा सुबक बांधणीचा दरवाजा 

पश्चिम टोकावर जाताना जो परिसर दिसतो तो फार रमणीय असून, उतरत्या सूर्याच्या केशरी रंगात त्याचं सौन्दर्य अजूनच खुलतं.  सूर्यास्ताचा मनमुराद आनंद लुटून आपण अस्ताला जाणाऱ्या केशरी गोळ्याला मनापासून अभिवादन करायचं आणि उद्या सकाळी परत अशीच ऊर्जा घेऊन नक्की ये म्हणत आपण परत आपल्या मुक्कामी गुहेकडे आल्या वाटेने यायचे. ह्या पश्चिम टोकाच्या खालून जी वाट जाते ती थेट आपल्याला साल्हेरवाडीत पोहोचवते. पायर्यांचा थरार अनुभवत हि वाट आपण सकाळी उतरताना वापरणार आहोत. रात्र झाली कि साल्हेरवर प्रचंड बदल होतात. अवाढव्य किल्ला आणि वाऱ्याचा बेलगामपणा आपली चांगलीच कसोटी बघतो. साल्हेर जितका रौद्र तितकाच मायाळू सुद्धा. इथे मुक्काम केलेली रात्र आपण कधीच विसरू शकत नाही. गडावर जनावरांचा वावर नसला तरी सरपटणारे जीव मात्र आसपास असू शकतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी. 

                इथून दिसणारा सूर्योदय हा अतिशय सुंदर आणि सह्याद्रीची अफाट ताकद दर्शवणारा असतो. त्यामुळे आपण पहाटेच उठून किल्य्याचं परशुरामाचं मंदिर गाठायचं. आपल्या गुहेच्या वरून जाणारी पायवाट आपल्याला २०-२५ मिनटात मंदिरावर पोहोचवते. पायवाट काही ठिकाणी निसरडी असून काळजी घ्यावी. हेच ते साल्हेरचं शिखर -परशुराम मंदिर. बेफाम वाहणारा वारा आणि वातावरणातली गूढता आपल्याला भगवान परशुरामाचं अस्तित्व ठासून दर्शवते. हि जागा फार खास असून येथून दिसणारी अखंड सह्याद्री पर्वत रांग डोळ्याचं पारणं फेडते.  त्रिकोणी आकाराचा टोकदार सालोटा, बेलाग धोडप , मुल्हेर ,न्हावीगड, मांगीतुंगी सगळंकाही एका टप्प्यात.  हा क्षण मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवावा असाच आहे. आता एव्हाना तांबडं फुटलेलं असतं. सूर्यनारायणाला मनोभावे नमस्कार करत निसर्गाने केलेली मुक्त उधळण डोळ्यात गच्च साठवून घ्यायची. आल्या मार्गे गुहा गाठून बॅग भरायला घ्यायची. 



सूर्योदयाच्या छाया प्रकाशात न्हाऊन निघालेला सालोटा -साल्हेर वरून 




परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवरून दिसणारा भव्य गंगासागर तलाव व आसपास चा परिसर 



सर्वोच किल्ल्यावरून दिसणारे सह्याद्रीचे अफाट रुप. समोर सालोटा आणि दूरवर मुल्हेर पर्यंतचा प्रदेश. 

 उतरताना साल्हेरवाडी मार्गी उतरणं सोयीचं. काल सूर्यास्त वेळी बघितलेली पश्चिम बाजूची वाट ती हीच. एक तर ह्या वाटेत सुद्धा दरवाज्याची सुंदर मालिका असून पायऱ्यांचा मार्ग बऱ्यापैकी साहसी आहे. दुसरं म्हणजे परतीची वाहनं आपल्याला साल्हेरवाडी गावातूनच लवकर मिळतात. वाघांमबे ला वाहने मिळण्यास फार वाट पाहावी लागते आणि वेळ खर्ची पडतो. 

महत्पूर्ण सूचना -
* साल्हेर लांब अंतरावर असून वेळेचे नियोजन पक्के करावे. 
*जेवणाचे साहित्य सोबत घेऊनच जावे 
*शक्यतो स्वतः चे वाहन असले तर उत्तम. गड बघण्यास जास्त वेळ देऊ शकतो. 
*मुक्काम करावा. 
*सालोटा शक्यतो टाळू नये. देखणा किल्ला आहे. 
*गडावर सरपण कमी असून, ट्रेक करताना हळू हळू लाकडं गोळा करत जावं. 
*वाटाड्याची तशी आवश्यकता नाही पण confidence नसेल तर अवश्य घ्यावा. 
*किल्ल्याची स्वछता आणि पावित्र्य राखणं हा आपला धर्म समजून वागावे आणि कोणी तसे करत नसल्यास त्याला अडवावे. 
*आपला गड -आपला अभिमान 

-जय महाराष्ट्र -

-ब्लॉग कसा वाटला हे कंमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा . भरपूर फिरा ,मौज करा पण निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता. 
पुढचा ब्लॉग -लवकरच 

-आपला 
Traveler AK
9664284368 / 9167979686 (Whatsapp)
Email- kastaniket@yahoo.co.in

YouTube Channel Link - https://www.youtube.com/channel/UCAnF28a_70u_Vry31fECZ7w

13 comments:

  1. Main udna chahta hoon, daudna chahta hoon, girna bhi chahta hoon ... bus rukna nahi chahta......1 number Aniket sir.....

    ReplyDelete
  2. *किल्ल्याची स्वछता आणि पावित्र्य राखणं हा आपला धर्म समजून वागावे आणि कोणी तसे करत नसल्यास त्याला अडवावे.
    *आपला गड -आपला अभिमान

    kadak mitra

    ReplyDelete
  3. Good one Aniket. Keep it up

    ReplyDelete
  4. Thank you so much dear 😘

    ReplyDelete
  5. Hello Aniket... Superb Blog Buddy.. I visited salher in rainy season.. it's a horrible but amazing experience... After reading your blog, like to visit once again salher... Thanks a lot.. Keep it up Buddy..

    ReplyDelete
    Replies
    1. O that's great. Even I wish to visit salher in monsoon. Bcoz I got to visit salher thrice only in winter. Thnx for the compliment.kip traveling

      Delete
  6. Replies
    1. Hey Yogita, thank you so much dear. See you soon on upcoming treks.

      Delete