Monday 14 September 2015

सह्याद्रीतल्या गप्पा आणि आठवणी

'सह्याद्रीतल्या गप्पा आणि आठवणी'






गेले अनेक महिने लिहायला काही सुचत नव्हतं, आणि जेव्हा सुचायचं तेव्हा वेळ नसायचा. ह्या अश्या गुंतागुंतीत लिखाण दूर जातंय ही जाणीव फार बोचत होती. सह्याद्रीमधे उनाड्पणे फिरताना कित्येकदा डायरी सुद्धा सोबत नेली. पण मन हे मोठं चंचल आणि उत्सुकतेनं भरलेलं असल्यामुळे सगळा वेळ फिरण्यात, फोटोग्राफी करण्यात आणि माझ्या सह्याद्रीशी गप्पा मारण्यातच जात असे. मी आणि हा बलाढ्य सह्याद्री दोघेही ठार वेडे आहोत. मी तर महावेडाच. आमचं काय चाललेलं असतं कुणास ठाऊक, पण एक हे एक विचित्र असं प्रेम प्रकरण आहे. आणि प्रेमात सगळं माफ असतं, नाही का ?




इथल्या mm च्या खड्यापासून ते १००० फुटी कातळापर्यंत प्रत्येक वस्तूवर, वास्तूंवर आणि जीवांवर फार जीव आहे माझा. इथलं प्रत्येक पान माझ्याशी बोलतं, प्रत्येक फ़ूल माझ्याशी हस्तं, इथला प्रत्येक कातळ मला उभारी आणि करारीपणा देतं, क्वचित प्रसंगी हे कातळ मला रागावतात सुद्धा. कुठेही डगमगलो कि शिव्या हासडतात आणि त्याला भिडण्यास प्रोत्साहन देतात. इथला बेफाम वारा म्हणजे फिरता दवाखानाच म्हणा, सगळा थकवा, त्रास, घाम एका क्षणात गायब करण्याचं कौशल्य ह्या वाऱ्यात आहे. इथलं आकाश मला भरारी घेण्याची अनेक स्वप्न बघायला भाग पाडतं, पंखांना बळ द्यायची वेळ झालीये असं बजावत असतं. आकाशाकडे टक लाऊन तासंतास बघत बसण्यात जे सुख आहे त्याला काय कशात मोजणार आपण. ढगांचे बदलणारे आकार, पृथ्वी कशी गोल फिरते ह्याचा होणारा भास, हे सगळं फारच चमत्कारिक आहे.





हे सर्व चालू असताना अचानक एक शिकारी पक्षी आकाशात घिरट्या घालताना दिसतो आणि एकाकी तो हवेतल्या हवेत स्थिरावतो. बेफाम वाऱ्याला केवळ दोन पंखांवर झेलत तो स्थिर आणि गंभीरपणे आपली ताकद अजमावत असतो. Wildlife च्या भाषेत सांगायचं झालं तर तो 'Hovering' करताना दिसतो आणि पुन्हा हे चंचल मन त्या पक्ष्याच्या विचारांनी घेरलं जातं. इतकी शक्ती ह्या पंखांमध्ये येतेच कशी ? ह्या प्रकारात लहान पक्षीसुधा अतिशय सफाईदारपणे ही कलाकुसर दाखवत असतात. काही क्षणांच्या ह्या खेळात निसर्ग कितीकाही शिकवून जातो.


















अशी प्रेरणा घेऊन मी पुन्हा भटकायला चालू करतो तोच पावले पुन्हा थबकतात. आपल्या वजनाच्या कितीतरी पट मोठं वजन एक जंगली मुंगी आपल्या खांद्यावर वाहून नेत असते. कैक वेळेला मी तिला प्रवाहाच्या उलट्या दिशेने प्रवास करताना पाहिलं आहे. केवढीशी ती मुंगी, काय तिची अफाट ताकद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती. तिला मनोमन सलाम ठोकत माझी पावलं पुढे सरकत असतात. नाना प्रकारच्या पानाफुलांनी आणि अक्राळ विक्राळ जुन्या वृक्षांनी भरलेला माझा सह्याद्री पाहताना एक विलक्षण समाधान असतं. ह्या घनदाट अरण्यात लाखो जीवाणू आपली दिनचर्या नियमितपणे पार पाडत असतात. आपण तिथे जातो तेव्हा नक्कीच त्यांना त्रास होत असणार, कारण हे शेवटी हे त्याचं घर आहे,आपलं नाही. पण आपल्यामुळे त्यांना कसलाही त्रास होऊ देण्याचा माझा आटोकाट प्रयत्न असतो. आपण सर्वांनीच तसा करायला हवा.





















सह्याद्रीमधलं माझं सगळ्यात आवडतं element म्हणजे 'पाणी'. मग ती झर्याची छोटी धार असो नाहीतर अखंड मोठा फेसाळता धबधबा असो, किवा एखादं विशाल तळ असो नाहीतर खोदीव पाण्याचं टाकं असो. पाणी हा एक अनोखा चमत्कार आहे सह्याद्रीचा. इथेसुद्धा आमचा गप्पांचा सिलसिला चालूच असतो.
















अश्या ह्या खडकातून आणि पाण्यातून वाट काढत काढत मधेच कुठेतरी गडाचा कातळ ,किवा अस्पष्ट तटबंदी दिसायला लागते आणि मग पावलं जो वेग पकडतात आणि केव्हा एकदा माझ्या दरवाज्याला आणि तट बुरुजांना मिठी मारतोय असं होऊन बसतं. चालताना मनात फक्त शिवराय, शंभूराजे आणि स्वराज्याचे लाखो वार आपल्या देहावर हसत हसत झेलणारे माझे मावळे आठवत असतात. अश्यावेळी खूप गहिवरून येतं आणि अभिमानाने भरून सुद्धा येतं. बेफाम तलवारबाजी करणारा बाजीप्रभू आठवतो, दिलेरखानाचा भाला छातीत रुतलेला असताना महाराजांच्या नावाचा जप करणारा मुरारबाजी आठवतो, त्या हरामजाद औरंग्याचे ४० दिवस अतोनात छळ सोसलेला संभाजीराजा आठवतो आणि आपल्या राजाला मरेपर्यंत साथ देणारा कवी कलश सुद्धा आठवतो. माझ्या किल्ल्यांवर अनेक मर्दांनी रक्ताचा सडा टाकला म्हणून आज मी हिंदू आहे ह्याचा मला फार अभिमान वाटतो. पण एका गोष्टीचं नेहमी प्रचंड वाईट वाटतं. ते म्हणजे- आपण त्या काळात जन्माला का नाही आलो ह्याचं. घर दार सोडून शिवरायांच्या पायाशी लोटांगण घातलं असतं आणि पडेल ते काम केलं असतं. दुर्दैवानं आज असे कोणतेच पावलं नाह्येत ज्यापुढे माथा टेकवावा





















अश्या मिश्र भावना आणि कल्लोळ मनात दाटलेला असताना एकाकी गडावर प्रवेश होतो आणि नकळतपणे शिवगर्जना ओठी येते  - प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलवतौस..................................................

















गडावर पोचताच त्या दगडी चीरांवरून हाथ फिरवत चालण्याचा माझा नेहमीचा शिरस्ता आहे. ह्यामागे माझी अशी श्रद्धा आहे कि जेव्हा आपण ह्या कातळावरून प्रेमाने हाथ फिरवतो तेव्हा दोघांमधे एक नातं निर्माण होतं, जवळीक आणि आपुलकी वाटू लागते आणि आपोआपच कातळाशी ऋणानुबंध जुळतात. अनेक वर्ष उपेक्षेत असलेले हे इतिहासाचे मूक साक्षीदार आपल्याशी बोलू लागतात आणि मग हजारो वर्षांचा कालखंड आपल्या नजरेसमोरून वाहू लागतो. इथेच सह्याद्रीची खरी गंमत आहे. अख्या जगात लाखो डोंगर आहेत, पण फक्त सह्याद्री ला इतिहास सुद्धा आहे. माझं काय थोर भाग्य कि मला सह्याद्री ने इतक्या कमी वर्षात आपलंसं करून टाकलंय. आणि नुसताच आपलंसं नाही केलं तर ह्या वेड्याने झिंगच चढवली आहे पार.


















विस्तीर्ण सह्याद्रीचा तेवढाच विस्तीर्ण इतिहास आणि जागो जागी त्याची साक्ष देत उभे असलेले किल्ल्यांचे अवशेष पाहताना मन उत्कंठेच्या शिखरावर असतं. कित्येकदा माझ्या आसपास मावळे फिरत असल्याचा भास होतो, महादरवाजातून कोणत्याहीक्षणी महाराज येतील असं सारखा वाटतं. मी कुठेतरी निवांत पहुडलो असताना अचानक शंभूराजे बघतील आणि आपल्याला दम भरतील अशी भीतीसुद्धा वाटते. गडावर असताना माझी अशी काही भंबेरी उडालेली असते कि विचारायची सोय नाही. मी शरीराने २१व्या शतकात आणि मानाने १६व्या शतकात.

















ह्या माझ्या सुंदर, देखण्या, रुबाबदार, बुलंद,राकट ,बलदंड सह्याद्रीची वेगवेगळी रूपं आपल्या कॅमेऱ्यात टिपता यावी म्हणून माझे अतोनात प्रयत्न चालू असतात. ह्यासाठी वाट्टेल  ते करताना माझ्या काही जवळच्या मित्रांनी मला पाहिलं आहेच. मी त्यांना गंमतीने म्हणतो कि 'दोनदा स्वर्गाची घंटा वाजवून आलोय, आता तिसर्यांदा थेट प्रवेश'. तर हे नालायक म्हणतात कसे- 'तुला स्वर्गात कोण घेणार, नर्क तरी available होतोय का बघ आधी'.
कितीही कुचके असले तरी आपले खास आहेत. त्यांच्याशिवाय सह्याद्रीची फेरी अर्धवटच वाटते.
'TWO IS THE COMPANY' ह्या नियमाप्रमाणे कित्येकदा मी आणि माझा कोणताही एकच मित्र असे भटकलोय. धोडपच्या डोंगरावर, बोचऱ्या थंडीत अख्या गडावर आम्ही दोघेच. ती शांतता आणि तुफान थंडगार वारा. गुहेमधे उंदरांनी मांडलेला उच्छाद, त्यामुळे एकही क्षण झोपायला मिळनं, मध्य रात्री बनवलेला चहा आणि सूर्याची पहिली किरणं गुहेत येईपर्यंत केलेलं अखंड जागरण. आम्हाला हे मधेच आठवतं आणि पोट धरून हसतो आम्ही. ट्रेकर असेच असतात, त्रास झालेल्या गोष्टी त्यांना आठवल्यावर ते अजून आनंद घेतात. हि जातच अशी आहे त्याला काय करणार.













अशीच आठवण साल्हेर गडावरची- डिग्री तापमान असताना मी आणि माझा मित्र एकाकी साल्हेरला निघतोय काय, तिथेही आम्ही दोघेच, सूर्यास्त पाहायला जातो आणि त्या प्रचंड बोचऱ्या थंडीत आमच्या अंगावर साधं स्वेटर नाही कि मोजे नाही, तुफान वारा, हातात कॅमेरा-ट्रायपॉड असा लवाजमा आणि आम्ही चाललोय पश्चिमेला. ना तहान ना भूक. पण ह्यासगळ्याचं काहीच वाटत नाही जेव्हा सह्याद्रीवर सूर्यास्ताची केशरी छटा उमटू लागते आणि सारा आसमंत एक विलक्षण कलाकृती तयार होताना दंग झालेला असतो. आणि आम्ही ? आम्ही एकदम स्तब्ध आणि वेगळ्याच मानसिक अवस्थेमधे. साल्हेरची पौर्णिमेची रात्र तर जन्मात विसरता येणार नाही अशीच.
















नुसत्या आठवणींची यादी करायला घेतली तर अख्खं पुस्तक बनेल. माहुलीच्या गर्द अरण्यातून केलेली रात्रीची चढाई, तो थरार आणि वरून सूर्योदय न्याहाळणं. 'नानाच्या अंगठ्यावर' जात असताना 'बसून' केलेली चढाई, कारण वाऱ्याचा लगाम इतका सैल झाला होता कि आम्ही उभे राहिलो कि तो आम्हाला खाली पडायचा. बसून जाण्याखेरीज पर्यायच नव्हता. गोरखगडच्या माथ्यावरून खाली पडलेली माझी कॅमेर्याची sack, आणि ती पकडण्याच्या नादात माझा गेलेला तोल, जो माझ्या मित्राने सावरला. मग हिरा सरांच्या मदतीने जंगलात शोध मोहीम आणि अखेर sack सापडते. असे थरारक प्रसंग आता फार मजेशीर वाटतात खरे पण त्यावेळेस मात्र भीतीने पार दाणादाण उडालेली असते. मोरोशीचा भैरवगड उतरताना सापडत नसलेली वाट, मुसळधार पाऊस, जिकडे तिकडे लागणारा 'dead end', अंधार वाढत चाललेला, त्या जंगलात बिबट्यांचा बऱ्यापैकी  वावर असल्याने सतत धाकधूक वाढत चाललेली, काय करावे दोघांनाही सुचेना. शेवटी धबधबा हा आपला गुरु असं म्हणून ती वाट आम्ही धरतो आणि धरपडत का होईना पायथ्याला पोचतो. पण इथेसुद्धा सह्याद्री माझी निराशा करत नाही. खाली उतरताच अचानक वातावरण बदलतं आणि एक सुंदर सुर्यास्ताचा फोटो मला बक्षीस म्हणून सह्याद्री देतो. ह्याला म्हणतात प्रेम. माझी नस बरोबर माहितेय त्याला.






गडावरची रात्र सुद्धा एक अजबच दुनिया आहे. इथे कोण तुम्हाला आशीर्वाद देईल आणि कोण शाप ह्याचा अंदाज बांधणं महाकठीण काम. अखंड सावध असणे हाच काय तो उपाय. गडद निळं आकाश, शांतपणे सगळ्यांवर नजर ठेऊन असलेला चंद्रमा, त्याच्या शीतल प्रकाशात स्वतःला शांत करून घेणारी पृथ्वी, एकाकी चिडीचूप झोपलेले पक्षी, झाडेही जरा गुंगीतच असल्याचा भास, वाऱ्याला मात्र वेळ काळ काही नसल्यासारखा रात्रीसुद्धा भरधाव वाहतोय, मधेच लुकलुकणारी चांदणी. सगळंच अगदी छान अल्ल्हादायक असताना मन पुन्हा कोलांट्या उड्या मारायला चालू करतं. वास्तवातून स्वप्न नगरीत प्रवेश घेऊ पाहतं. आपल्याला झेपणाऱ्या आणि परवडणाऱ्या गोष्टी करण्यात ह्या मनाला काय धन्यता वाटते कोणास ठाऊक. विचारांच्या घोड्याला लगाम द्यायला गेलो कि तो अजूनच सुसाट धावतो. सह्याद्रीतली रात्र म्हणजे गणिताचा तास असतो माझ्यासाठी.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर करायच्या असलेल्या 'वजा बाकी' करण्याचा तास.
 भूतकाळातल्या गोष्टी 'वजा' करून भविष्यात 'बाकी' काय काय ठेवायचं ह्याचा तास.
अनेक प्रसंगात आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्ती 'वजा ' करण्याचा तास.
पुढील प्रत्येक प्रसंगात आपल्यासोबत नेहमी असतील अश्या काही व्यक्ती 'बाकी' कश्या ठेवता येतील ह्याची आखणी करण्याचा तास.
सह्याद्रीची रात्र आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते,अगदी अचूक. तिसऱ्या डोळ्याने विश्व बघावं तसं हि रात्र आपल्याला खरं विश्व दाखवते आणि अनेक गोष्टींची जाणीव आणि उलगडा करून देते.





 अश्याच एका रात्री  'ती ' नावाची concept डोक्यात येते आणि बघता बघता त्याची कविता बनते- अतिशय spontaneously सुचलेली हि कविता, प्रत्येकाला आपली ' ती ' नक्कीच याद आणून देईल.-


'ती '
इथला झरा तुझ्याच  आनंदात वाहतो,
इथली पाखरं तुझ्याच चंचल स्वभावाची आठवण करून देतात,
इथल्या दवबिंदूंवर तुझाचाच ओलावा आहे,
इथली फुलं तुझेच गीत गटात ,
इथल्या सुळक्यांवर तुझेच शौर्य लकाकते,
इथले मळभ तुझ्याचरुपी पावसाची चाहूल देतात,
इथल्या किरणांवर तुझीच झळाळी असते,
इथले नभ तुझाच स्वच्छंद विहार दर्शवते,
इथल्या वेलींवर तुझाच हळुवारपणा आहे,
इथले कातळ तुझीच शक्ती सांगतात,
इथला दगड तुझाच खोडकरपणा याद आणतो,
इथल्या मातीवर तुझ्याच पाऊलखुणा आहेत,
इथल्या विजेत तुझाच करारीपणा आहे,
इथला उन्हात तुझ्याच आठवणींचा दाह आहे,
इथल्या प्रत्येक वृक्षात तुझीच सावली आहे,
इथल्या वाऱ्यावर तुझीच झुळूक आहे,
इथल्या वादळात तुझेच तांडव आह,
इथल्या चंद्रात तुझीच शीतलता आहे,
इथल्या चांदण्यात आपल्यातील अंतर आहे,
इथल्या काळोखात तुला गमावण्याची भीती आहे,
इथल्या भयाण शांततेत तुझीच हुरहूर आहे,
इथल्या सुर्योदायात तुझीच अशा आहे,
इथल्या सुर्यास्तात मात्र तुझीच निराशा आहे,
इथला तू असण्या, नसण्याचा खेळ तसाच आहे,
तोही तसाच आहे, आणि ती ???
तीही तशीच - निस्तब्ध, एकाकी आणि अलिप्त.
- अनिकेत



ब्लॉग कसा वाटला ते ह्या पोस्टला comment करून नक्की कळवा , किवा mail सुद्धा करू शकता -
kastaniket@yahoo.co.in 

धन्यवाद!!!

माझे फोटो काढलेल्या सर्व मित्रांचे मनापसून कौतुक करतो, आभार नाही मानणार कारण मैत्रीत आभार प्रदर्शन नसतं. 
त्यांच्यामुळेच अनेक प्रसंग कायमस्वरूपी  'saved ' राहतील. 


All Photo copyrights are reserved with the Photographer, any use of the same will require prior permission of the Photographer- Aniket Kasture-9664284368